Tuesday, 11 March 2014

घर..

             मला जेंव्हापासून कळायला लागलंय आणि कदाचित त्याही आधीपासून आमच्या घराने मला अंगाखांद्यावर खेळवलय. कुठे लाकडी खांबावर छिद्र पाड, कुठे भिंत पोखर, कधी ह्या टोकापसून त्या टोकापर्यंत ओरखडे काढ, कधी जमिनीवर आदळ -आपट कर, कुठे अंगणातल्या फरशीचे पोफडे काढ, कधी दरवाज्याच्या बिजागीरीशी खेळ. एक ना अनेक तर्हेचे उपद्व्याप मी केले असतील. पण कधी घराने हु कि चू  केलेले मला तरी आठवत नाही. मोठी माणसे माझ्या खोड्यांची शिक्षा मला न मागता द्यायचे. पण म्हणून घरच्या अंगणातल्या जमिनीने माझे कधी पाय पोळले नाहीत, उंबरठ्याने कधी पायांना रक्तबंबाळ केले नाही, फरशीने आपण होऊन मला कधी पाडले नाही. ते मला फक्त खेळवत राहिले मनसोक्त.

माझी आजी आम्हा मुलांना सांगायची, "बाबारे! घर आहे म्हणून आपण आहोत". मला कधी ते कळलेच नाही लहानपणी कारण माणसे नसतील तर घर कुठून येणार? मग आजी सांगायची " घरात  वास्तुपुरुष असतो जो माया करतो सगळ्यांवर". तो माणूस कधी दिसला नाही मला घरात पण आता जाणवते, कदाचित तो होता म्हणुनच मला कधी दुखले खुपले नसेल.

माझ्या बाबांच्या जन्माआधीपासून आमचे घर उभे आहे, उन खात, पाउस पचवीत, बोचरा वारा सोसत. पण एकदा देखील बाहेरची धग कधी घराने चार भिंतींच्या आत आणली नाही. उन्हाळा हिवाळ्यात झालेल्या त्याच्या जखमा जेंव्हा पावसाळ्यात चिघळायच्या तेंव्हाच आम्हाला कळायचे पण तोपर्यंत घर सगळे मुक्याने सहन करायचे.  मग माझी आजी स्वतः ती जागा लिंपायची, प्रत्येक भेग मोठ्या काळजीने मुजवायची. आम्ही लहान मुले हे सगळे कुतूहलाने  बघायचो. पण घराला देखील कधीतरी आपल्या आधाराची गरज असते हे आमच्या बालमनाला कधी कळले नाही आणि घराने देखील ते आम्हाला कधी कळू दिले नाही.

घराची अशी आमच्या वर काय म्हणून माया होती हे कधी समजलेच नाही मला...

आता जेंव्हा घराची आठवण येते तेंव्हा मन सैरभैर व्हायला होते. घर पाडताना घातलेल्या पहिला घाव आणि शेवटचा घाव यामध्ये घराने किती अश्रू ढाळले ते आम्हा कुणालाच दिसले नाहीत.  केलेल्या प्रत्येक खोडीची  माफी मागायची तरी आता कुणाजवळ. ज्या दिवशी घर पाडले त्याच दिवशी आठवणींची जी नाळ इतके वर्ष अतूट  होती तीच तुटली होती आणि उरले होते फक्त एक अभेद्य कवच सुरक्षिततेच्या भावनेचे ... 

आताशा असे वाटते.. बरे होईल तो घरबाप्पा भेटला तर.. विचारेन त्याला काय होते म्हणून एवढी माया केलीस आमच्यावर..