Tuesday, 11 March 2014

घर..

             मला जेंव्हापासून कळायला लागलंय आणि कदाचित त्याही आधीपासून आमच्या घराने मला अंगाखांद्यावर खेळवलय. कुठे लाकडी खांबावर छिद्र पाड, कुठे भिंत पोखर, कधी ह्या टोकापसून त्या टोकापर्यंत ओरखडे काढ, कधी जमिनीवर आदळ -आपट कर, कुठे अंगणातल्या फरशीचे पोफडे काढ, कधी दरवाज्याच्या बिजागीरीशी खेळ. एक ना अनेक तर्हेचे उपद्व्याप मी केले असतील. पण कधी घराने हु कि चू  केलेले मला तरी आठवत नाही. मोठी माणसे माझ्या खोड्यांची शिक्षा मला न मागता द्यायचे. पण म्हणून घरच्या अंगणातल्या जमिनीने माझे कधी पाय पोळले नाहीत, उंबरठ्याने कधी पायांना रक्तबंबाळ केले नाही, फरशीने आपण होऊन मला कधी पाडले नाही. ते मला फक्त खेळवत राहिले मनसोक्त.

माझी आजी आम्हा मुलांना सांगायची, "बाबारे! घर आहे म्हणून आपण आहोत". मला कधी ते कळलेच नाही लहानपणी कारण माणसे नसतील तर घर कुठून येणार? मग आजी सांगायची " घरात  वास्तुपुरुष असतो जो माया करतो सगळ्यांवर". तो माणूस कधी दिसला नाही मला घरात पण आता जाणवते, कदाचित तो होता म्हणुनच मला कधी दुखले खुपले नसेल.

माझ्या बाबांच्या जन्माआधीपासून आमचे घर उभे आहे, उन खात, पाउस पचवीत, बोचरा वारा सोसत. पण एकदा देखील बाहेरची धग कधी घराने चार भिंतींच्या आत आणली नाही. उन्हाळा हिवाळ्यात झालेल्या त्याच्या जखमा जेंव्हा पावसाळ्यात चिघळायच्या तेंव्हाच आम्हाला कळायचे पण तोपर्यंत घर सगळे मुक्याने सहन करायचे.  मग माझी आजी स्वतः ती जागा लिंपायची, प्रत्येक भेग मोठ्या काळजीने मुजवायची. आम्ही लहान मुले हे सगळे कुतूहलाने  बघायचो. पण घराला देखील कधीतरी आपल्या आधाराची गरज असते हे आमच्या बालमनाला कधी कळले नाही आणि घराने देखील ते आम्हाला कधी कळू दिले नाही.

घराची अशी आमच्या वर काय म्हणून माया होती हे कधी समजलेच नाही मला...

आता जेंव्हा घराची आठवण येते तेंव्हा मन सैरभैर व्हायला होते. घर पाडताना घातलेल्या पहिला घाव आणि शेवटचा घाव यामध्ये घराने किती अश्रू ढाळले ते आम्हा कुणालाच दिसले नाहीत.  केलेल्या प्रत्येक खोडीची  माफी मागायची तरी आता कुणाजवळ. ज्या दिवशी घर पाडले त्याच दिवशी आठवणींची जी नाळ इतके वर्ष अतूट  होती तीच तुटली होती आणि उरले होते फक्त एक अभेद्य कवच सुरक्षिततेच्या भावनेचे ... 

आताशा असे वाटते.. बरे होईल तो घरबाप्पा भेटला तर.. विचारेन त्याला काय होते म्हणून एवढी माया केलीस आमच्यावर..
 

Sunday, 28 October 2012

एकांत...



     "एकांत" ... माझे मन आणि माझी बुद्धी आयुष्यभर एकमेकांशी भांडत आले आहेत. जरा म्हणून गप्प बसवत नाही त्यांना. दोन्ही अर्थांनी म्हणा.. पण "दुसऱ्याचे" विचार हाणून पाडणे एवढेच काम करायचे असा दोघांचाही मनोनिग्रह असतो. "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ" हि म्हण केवळ म्हणायलाच ठीक आहे. कारण हे दोघे जेंव्हा भांडायला लागतात तेंव्हा माझी मात्र मधल्या मधे फरपट होते... निष्कारण. जिंको कुणीही, माझा मात्र गोंधळ उडतो.

    कोणताही  निर्णय घ्यायची वेळ आली की हे दोघे जण नेमके टपकतात. दोघांच्याही मनात आसुडाची भावना जागी होते आणि रणकंदन माजते. उमजत नाही मग अशा वेळी काय करायचे आणि "बावळट" या विशेषणाने माझी ख्याती आणखी पसरत जाते.

    ज्याचे वर्चस्व उरेल त्याचा तो निर्णय मग "एक"मताने घेतला जातो. आणि निर्णय तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्या दोघांमधला एक जण जिंकत नाही. हार मानणे दोघांच्याही रक्तात नाही... त्यामुळे समोरच्याचा अंत करूनच इथे किलमिष संपते... कदाचित म्हणूनच त्याला म्हणत असावेत "एकांत".. एकाचा अंत..

   म्हणूनच का असेना पण माझ्या विचारांना त्यांच्या वाहणाऱ्या रक्ताची संवेदना आहे... त्याचीच एक उपरती या चार ओळीत..



जन्मांतरीच्या नात्यांची
एक गोधडी माझ्या उराशी
फुका कलह मात्र मनाचा
सूर जुळेल का त्यांच्या सुराशी ?

हा असा तर ती तशी परी गुंफिले
मी सारे मणी एका धाग्याशी
मन विचारे काय साधशी करून यत्न
रगडण्याचे त्या निष्फळ वाळू कणांशी?

मना तुझ काय ठावे भय बांडगुळाचे?
त्याचा देखील जीव जातो त्याच्या दात्यासंगे
उत्तरी मन, हरवला तुझा स्वाभिमान
तुझ हौस नवखी म्हणुनी माळूनी घेशी परवशाचे फांद्ये

बोलून चालून माझेच मन ते
कसे ऐकेल माझ्या बोलांशी
बाली-सुग्रीव द्वंद्व पेटले मग
माझेच माझ्या मनाशी...
   
     

Monday, 10 September 2012

ती आली आणि गेली...आठवण तेवढी राहिली..




    कवितेचे अनेक पैलू असतात. पण खरच एखादी कविता एखाद्या व्यक्तीला कितपत कळली आहे हे शोधून काढायला एकही साधन नही. पण तरीही हजारो कवी त्यांच्या कविता इतरांना ऐकवण्याचे धाडस करतातच. ज्याला समजली ते त्याचे अथवा कवीचे नशीब...

माझा देखील एक असाच प्रयत्न ...




होती धुंद पाऊल वाटेवरती
तिची चाहूल विरत गेलेली
गर्द धुक्याने नकळत जिला
सर्वांगी मुक्त चुम्बीलेली
ओला पाऊस होता वेडा
पाठलाग करत गेलेला
ओझरत्या स्पर्शाने तिच्या
वाटेवरचा केवडा शहारलेला
उन्मळून वेलीवरचे फुल
ऐकलेच मनाशीच हसलेले
नुकतेच कुणीतरी ज्याला
मृदुल पाउली ठेचलेले
इंद्रधनुचे रंग लेवूनी
फुलपाखरू बागडलेले
भाळून कांतीस जिच्या
उन्मत्त अन् वेडावलेले
साक्ष देती खुणा साऱ्या
तिचीच ओळख पटलेली
भिरभिरते नजर शोधण्या
भेटून हि जी न भेटलेली....